नागपूर,
Vinod Rapatwar : कोणत्याही व्यक्तीकडून चुका या होऊ शकतात, मात्र क्रोधातून केलेल्या चुका कुणाच्या आयुष्यावर बेतू शकतात. यात जीवित हानी, आर्थिक हानीसह समाजालाही मोठी किंमत वेळ प्रसंगी मोजावी हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत मनाचा संयम व क्षणीक क्रोधापासून स्वत:ला वेळीच सावरणे महत्वाचे असते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले.
मध्यवर्ती कारागृह,नागपूर येथे बंदीजनांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमासह तरलतम संवेदना वृध्दींगत व्हाव्यात या उद्देशाने आयोजित ‘ जीवन गाणे गातच जावे ’ या सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारागृहाचे अधिक्षक वैभव आगे, कार्यक्रम समन्वयक डॉ अर्चना सिंगम, अति. अधिक्षक दीपा आगे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रज्ञा पाटील, कुलदीप कोवे आदी उपस्थित होते.
सज्जनशक्तीवरच समाजातील एकोपा
प्रत्येक व्यक्तीमध्ये सज्जनशक्ती दडलेली असते. या सज्जनशक्तीवरच समाजातील सौहार्द, सहिष्णूता, एकोपा, एकमेकाच्या मदतीला धावून जाणे असे मूल्य वृध्दींगत असतात. समाजाचे स्वास्थ्य यावरच अवलंबून असते. वर्तनातून कोणतेही व कुणाचेही नुकसान होणार नाही हे जीवनमूल्य कुठेही जपता येते, असे विनोद रापतवार यांनी सांगितले.
कारागृहात सुधारात्मक कार्यक्रम
सज्जनशक्तीचे प्रतिक म्हणून समाज आजही विश्वासाने आपल्याजवळ येण्यास तत्पर असून येथील बंदीवासानंतर आपण बाहेर जेव्हा पडाल तेव्हा हे मूल्य अधिक प्राणपणाने जपाल असा त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचा बंदीजनांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे व त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याकरीता या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. अर्चना सिंगम यांनी प्रास्ताविकात सांगितले. कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, कारागृहात बंदयांसाठी राबविण्यात येत असलेले सुधारात्मक कार्यक्रमाची माहिती दिली. बंदीजनांच्या आत्मिक समाधानासाठी बंदीगृहातील विविध आधारीत उपक्रम महत्वाचे आहेत. त्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधीसह आपल्या कौशल्यात अधिक निपूणता साध्य करता येते असे कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी सांगितले. मागील ९० दिवसात १५० बंदयांना कौशल्य प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी माहिती दिली.
यावेळी मुकूल पांडे, उल्हास चिटमुलवार, विजय साहू, पवन गायधने, स्नेहा डोंगरे, उत्तमराव चिल्हाटे, डॉ.दर्शना गडाख डॉ.ऋषभ रोहिनी पठाडे, भक्ती चौधरी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन बंदीजनांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक डॉ. शिवानी राऊत, डॉ.लिना कापगते, डॉ. अमोल धनाईत, डॉ.नर्मदा मेश्राम, डॉ. ऐश्वर्या धोटे आदींनी परिश्रम घेतले.