आयपीएल पहिल्या सामन्यात सट्टेबाजांची ‘फटकेबाजी..’

बुकींना आशीर्वाद कोणाचे..?

    दिनांक :26-Mar-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
IPL-bookies : सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झालीअसून यवतमाळातील सट्टेबाजांनी पहिल्याच सामान्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. एवढेच काय तर या अवैध धंद्याला आशीर्वाद मिळावा, म्हणून ‘पंटर’ चांगलेच कामी लागले आहेत. तर प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाèयांची याला ‘अर्थपूर्ण’ संमतीसुद्धा असल्याचेसुद्धा बोलल्या जात आहे.
 
 
 
y26Mar-Cricket-Cartoon
 
 
आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. तब्बल 65 दिवस चालणाèया या स्पर्धेदरम्यान होणाèया प्रत्येक सामन्यावर कोट्यवधींचा सट्टा लागत आहे. यासाठी जिल्ह्यातील ‘नामांकित’ बुकींनी देवाण-घेवाणीचा संपूर्ण खेळ हा ‘पंटर’वर सोपविला आहे.
 
 
यात सध्या यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी आणि वणीतील पंटर सध्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ असून, ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान पोलिसापुढे असताना मात्र, काहींनी मात्र या प्रकाराला मूकसंमती दिल्याने कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक कुमार चिंता आता यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
हे बुकी बेटिंगसाठी बोगस सीमकार्डचा वापर करत आहेत. क्रिकेट बेटिंगसाठी मोबाईल कंपन्याचे सीमकार्ड घेतानासुद्धा बोगस नावांची कागदपत्रे वापरली जात आहेत. सीमकार्ड वितरक आणि बुकी काही लोकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून सीमकार्ड खरेदी केल्याचे दाखवतात. काही सामन्यांसाठी याचा वापर करून पुन्हा त्याच कागदपत्रांच्या आधारे दुसरे सीमकार्ड खरेदी केले जाते, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून अनेकदा समोर आली आहे.
जिल्हा मुख्यालयातच अवैध धंदे जोरात
 
 
पोलिस अधीक्षक चिंता यांनी अवैध धंदे बंद करण्याचे असे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा मुख्यालयी, यवतमाळ शहरातच मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मटका, जुगार, भिंगरीचा यात समावेश आहे. अवैध धंदेवाल्यांकडून लक्ष्मीदर्शन करवून देण्यासाठी काही अधिकाèयांनी ‘विश्वासू’ कर्मचाèयांवर जबाबदारी सोपवली आहे. शहरातील शारदा चौक, अप्सरा टॉकीज, आठवडी बाजार, कॉटन मार्केट, रेल्वे स्टेशन, स्टेट बँक चौक, भोसा रोड यांसह अनेक भागात मटका सुरू आहे. यातून पोलिस अधीक्षकांच्या आदेशांना केराची टोपली दाखविण्यात येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही याकडे कानाडोळा केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.