१०८ पांदण रस्त्यांची कामं आठ वर्षांपासून अपूर्ण!

पांदण रस्त्यांची अवस्था दयनिय

    दिनांक :27-Mar-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा वर्धा, 
Wardha शेती हंगामात शेतकर्‍यांना खते, बियाणे आणि इतर साहित्य शेतात नेण्यासाठी तसेच बैलबंडीच्या सहाय्याने शेतातून माल बाजारात नेण्यासाठी पांदण रस्त्यांची आवश्यकता असते. मात्र, अनेक गावांतील पांदण रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात जाण्याकरिता शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान, सन २०१७ पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने पांदण रस्त्यासाठी योजना राबविण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ४६२ पांदण रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार होते. मात्र, मार्च २०२५ पर्यंत केवळ ३५४ पांदण रस्त्यांचेच काम पूर्ण झाले असून उर्वरित १०८ पांदण रस्त्यांचे काम अपूर्णच आहे.
 

Wardha 
 
 
सेलू तालुक्यात पांदण रस्त्याचे ८१ अर्ज प्राप्त झाले. मात्र ६१ कामे पूर्ण झाली. आर्वी तालुयात ६५ पैकी ४९ कामे पूर्ण झालेली आहेत. १६ पांदण रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. आष्टीतील १७ पैकी १३, कारंजा तालुक्यात एकच पांदण रस्ता करायचा होता, पण तोही अपूर्णच राहिला. वर्धा तालुयात ५९ पैकी ४५ पांदण रस्ते झाले. देवळी तालुयात ७३ पैकी १७ कामे अपूर्ण आहेत. हिंगणघाट तालुयात ९४ पैकी ७२ पूर्ण तर २२ कामे अपूर्ण आहेत. समुद्रपूर तालुयात ७२ पैकी ५८ कामे पूर्ण झाली असून १४ पांदण रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत.
 
 
 
शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारातून अभिनव उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत सीएसआर फंडातून दोन जेसीबी खाजगी कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार होत्या आणि ते पांदण रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामासाठी वापरण्यात येणार होत्या. मात्र, अद्यापही उर्वरित पांदण रस्त्यांची कामे पूर्ण होऊ शकली नाही.
 
 

१ किमीसाठी २० लाख
 
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १ किमी पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्धा पॅटर्ननुसार १ किमी रस्ता कमी खर्चात अतिक्रमणमुक्त करण्याची योजना राबविण्यात येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम केल्याने शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास मदत होईल. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर वाढणार आहे.