तभा वृत्तसेवा
वर्धा,
Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आपल्या परिसरात शासनाच्या सुविधा तातडीने व सुलभतेने मिळाव्या यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने २३ आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. या केंद्रासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सरकारी कार्यालयातील कामकाजासाठी प्रचंड वेळ लागत असल्याने नागरिकांना हेलपाट्या माराव्या लागतात. वर्धा शहरालगत अनेक ग्रापं लोकसंख्येने मोठ्या आहेत. या ग्रापं क्षेत्रात आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करून येथील नागरिकांना सहजतेने शासकीय योजनांचा लाभ व आवश्यक कागदपत्रे मिळावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला.
सन २०२४-२५ मधील जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत वर्धा तालुयातील पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, पवनार, साटोडा, बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), आंजी (मोठी), सालोड (हिरापूर), म्हसाळा, वरुड, वायगाव, उमरी (मेघे), सेवाग्राम, सेलू तालुयातील घोराड, केळझर, हिंगणी, देवळी तालुयातील नाचणगाव, गुंजखेडा, आष्टी तालुयातील तळेगाव (श्यापं), हिंगणघाट तालुयातील अल्लीपूर, वडनेर व समुद्रपूर तालुयातील गिरड या ग्रापं क्षेत्रात आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील २३ ग्रापं क्षेत्रात आदर्श आपले सरकार केंद्राची उभारणी करण्यासाठी प्रत्येक केंद्राला २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न : ना. डॉ. भोयर
जिल्ह्यातील २३ ग्रापं आकाराने आणि लोकसंख्ये मोठ्या आहेत. येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळावा तसेच विद्यार्थी व नागरिकांना कामकाज संबंधी कागदपत्रे तातडीने मिळावी. यासाठी आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रातून नागरिक विविध योजनांचे अर्ज भरू शकतात. तसेच विद्यार्थी देखील लाभ घेऊ शकतात. लवकरात लवकर केंद्र सुरू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.