मनोज रायपुरे,
वर्धा,
Contractual system : आजच्या पिढीची शेतात दिवसभर राबण्याची तयारी नाही. आता दिवसभराचे काम २ ते ४ तासावर आले आहे. तर काही मजूर ठरावीक कामाचा मोबदला ठरवून ते काम आपल्या मर्जीने करतात. एकंदरीतच शेतात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला. त्या पाठोपाठ शेतात पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत काम करण्याची कुणाची तयारी नाही. यामुळेच वार्षिक पॅकेज दीड लाख करूनही शेतकर्यांना सालदार मिळत नसल्याचे वास्तव आहे.
रविवार ३० रोजी गुढी पाडवा, मराठी नववर्षाला सुरुवात होणार आहे. ज्या शेतकर्यांकडे जास्त शेती आहे. ते शेतकरी मराठी नववर्षाला शेताच्या कामाकरिता सालदार ठेवतात. यंदा जिल्ह्यात सालगड्याचे पॅकेज एक ते दीड लाखापर्यंत गेले आहे. जिल्ह्यात दीड लाख रुपये देऊनही सालगडी मिळत नसल्याचे वास्तव आहे. अनेक शेतकरी इतर जिल्ह्यातून सालदार कामाकरिता आणतात. यासाठी शेतकर्यांना सालदाराच्या परिवारी राहायची व्यवस्थासुद्धा करून द्यावी लागते. दीड दोन लाखाच्या पॅकेजसोबत गहू आणि सुट्ट्याही द्याव्या लागतात.
तीन ते चार वर्षांपासून शेतकर्यांना खरीप, रब्बी हंगामात नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदा तर खरीप व रब्बी हंगामातून शेतकर्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. परिणामी, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिकांच्या उत्पादनात घट, लागवड खर्चात वाढ तर दुसरीकडे बाजारपेठेत उत्पादीत मालाला भावही समाधानकारक मिळत नाही. अशा परिस्थितीत शेती तोट्याची ठरत आहे. लागवड खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेती करावी, कशी असा प्रश्न शेतकर्यांपुढे आहे. यातच मजुरीचे भाव वाढले आहे. वार्षिक दीड लाख रुपये देऊनही शेतीच्या कामाला सालदार मिळत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.
फुकट्या योजनांचा परिणाम
शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहे. यातून फुकट धान्यासोबतच महिन्याकाठी काही ठरावीक रोख अनुदान सुद्धा मिळत आहे. यामुळे बहुतांश जणांना कामाची गरज उरली नाही. शेतात काम करण्यासाठी मजूर आवश्यक असले तर शेतकर्यांवर मजूर शोधण्याची वेळ येते. मजूर मिळत नसल्याने मजुरीही वाढवून द्यावी लागत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.