पुणे,
hapus mango साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला आंब्यांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा हवामानातील अनियमिततेमुळे कोकणातील आंबा उत्पादन घटल्याने बाजारात हापूस आंब्यांची आवक मर्यादित झाली आहे. परिणामी, आंब्यांचे दर गगनाला भिडले असून, डझनाचा दर ८०० ते १५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा दर ५०० ते ७०० रुपये होता.
हवामानाचा फटका उत्पादनाला
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कोकणात अपेक्षित थंडी न पडल्याने मोहोर गळून पडला. परिणामी, आंबा उत्पादन घटले. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी युवराज काची आणि अरविंद मोरे यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे मार्च महिन्यात कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यंदा ही संख्या घटून केवळ एक ते दोन हजार पेट्यांवर आली आहे.सणासुदीच्या कालावधीत आंब्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या कच्च्या आंब्याच्या चार ते आठ डझनांच्या पेटीला प्रतवारीनुसार २५०० ते ६००० रुपये दर मिळत आहे. कमी उत्पादनामुळे पुढील काळातही आंब्यांचे दर वाढण्याची शक्यता असून, ग्राहकांना हापूससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.