वरूड,
Massive fire in Jining वरूड शहरापासून काही अंतरावरच असलेल्या रोशनखेडा येथील भवानी जिनिंग अॅण्ड प्रेसिंगला अचानक दुपारच्या सुमारास आग लागल्याने या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, रोशनखेडा येथील नरेंद्र खंडेलवाल यांच्या नावे असलेल्या भवानी जिनिंग अॅण्ड प्रेसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करून गठाण तयार केल्यानंतर भारतातील विविध ठिकाणी निर्यात केली जाते. त्याच परिसरात ऑईल मिल असल्याने जिनिंगला आग लागल्याचे सर्वप्रथम तेथील कर्मचार्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती कर्मचार्यांनी नरेंद्र खंडेलवाल, शरद खंडेलवाल, सौरभ खंडेलवाल यांना दिली.

त्यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत अग्निशमन विभाग व पोलिस प्रशासनाला कळविले. तत्पूर्वी भवानी जिनिंगमध्ये असलेल्या अग्निश्यामक यंत्राच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर वरुड आणि शेंदुरजनाघाट येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. Massive fire in Jining काही वेळानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑईल मिल परिसरातील ढेप, सरकी, ऑईल मिलचा काही भाग, बारदाणा, केबल, विद्युत पंप यासह विविध साहित्य जळून राख झाले होते. या आगीमध्ये अंदाजे ७० लाख रुपयांचे साहित्य जळून राख झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या जिनिंग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, रुई आणि गठाण असून आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही आग शार्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.