तप्त लोखंडासोबत खेळण्याची ताकद देतो महाबली

    दिनांक :11-Apr-2025
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Hanuman Mandir गावा गावात हमखास सापडणारे मंदिर म्हणजे हनुमानाचे! आता गावांमध्ये वस्त्या वाढल्या त्यामुळे पुन्हा त्या वस्त्यांमध्ये हनुमानाची मंदिर उभारण्यात येऊ लागली. या मंदिरांच्या उभारणीत परिसरातील नागरिकांचा हातभार लागतो. त्यामुळे ते मंदिरही आपलेसे वाटते. खाजखी कार्यालयं वा कारखान्यांमध्ये विघ्नहर्ता म्हणून गणपतीची मूर्ती असते. पण, पवनार मार्गावर असलेल्या डोडाणी चौकातील विनायका इस्पात या लोखंडाच्या सळाखी तयार करणार्‍या कारखान्यात हनुमानाची स्थापना करण्यात आली. ही मुर्ती तप्त लोखंडाला हाताळण्याची ताकद देते अशी भावना मालकाचीच नव्हे तर त्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची आहे.
 
 
Hanuman Mandir
 
प्रत्येक व्यक्तीची कुठे ना कुठे श्रद्धा असते, तो त्या ठिकाणी नतमस्तक होतो. समाजात बोटावर मोजता येतील तेवढे सोडले तर देवाचा धावा करणार्‍यांची संख्या सर्वच धर्मामध्ये आहे. हिंदू समाजात ३३ कोटी देव असल्याने तेथे सण उत्सवांची रेलचेल असते. वर्धेत प्रत्येक सणांचा जसा उत्सव होतो तसाच हनुमान जयंतीचाही होतो. यावर्षी हनुमान जयंती शोभायात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. Hanuman Mandir अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते. या मंदिरांपैकी एक हनुमानाचे खाजगी मंदिर डोडाणी चौकातील विनायका इस्पात आणि वंश स्टील या कंपनीतील! २८ वर्षांपूर्वी वर्धेतील काशीप्रसाद पोद्दार आणि शेगाव येथील राजकुमार दिवानका यांनी लालचंद डोडाणी यांच्याकडून लोखंडी सळाखींची निर्मिती करणारा कारखाना विकत घेतला.
 
या कारखान्यात १९९३ मध्ये हनुमानाची मुर्ती बसवण्यात आली. पोद्दार आणि दिवानका यांनी कारखाना विकत घेतल्यानंतर १९९८ मध्ये हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार केला. तेव्हापासुन त्या परिसरात हनुमान जयंतीचा जोरदार कार्यक्रम होतो. येथील मंदिरातील आरास बघण्यासाठी जाणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हनुमानाची लहानशी पण आकर्षक अशी मुर्ती असुन सिंहासन आणि गदा चांदीची आहे. Hanuman Mandir दरवर्षी येथे दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. व्यवहार आणि व्यवसाय म्हटला की अनेक समस्या आणि संकटं येतात. परंतु, आमचे महाबली ते संकट आमच्यापर्यंत पोहोच देत नाहीत. प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद येथुन मिळत असल्याचे महेश पोद्दार यांनी सांगितले.