बेंगळुरू,
Karnataka कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील दांडेली शहरात पोलिसांच्या कारवाईत एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. गांधीनगर भागातील एका बंद घरावर पोलिसांनी छापा टाकून ५०० रुपयांच्या नोटांच्या थरावर थर सापडले. प्रारंभी या कारवाईने खळबळ माजवली, मात्र पुढील तपासात या नोटा प्रत्यक्ष व्यवहारासाठी नसून केवळ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या 'प्रॉप करन्सी' असल्याचे समोर आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, नोटा मोजण्याचे मशीन आणि बऱ्याच प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटांसारखे दिसणारे कागद मिळाले. मात्र, बारकाईने पाहणी केली असता या नोटांवर ‘Reserve Bank of India’ऐवजी ‘Reverse Bank of India’ असा मजकूर आढळून आला. तसेच नोटांवर अंकाऐवजी ‘000000’ असा क्रमांक आणि गव्हर्नरची स्वाक्षरी नव्हती.या संदर्भात घरमालक नूरजान झुंझुवाडकर यांनी माहिती दिली की, त्यांच्या घरात राहणारा भाडेकरू अर्शद खान गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहे. अर्शद खान गोव्यात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नूरजान यांनीच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.
तपासात उघडकीस आले की, या बनावट नोटा खऱ्या अर्थाने बनावट नव्हत्या, तर केवळ चित्रपट चित्रीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रॉप करन्सी होती. तरीही, इतक्या मोठ्या प्रमाणावर या नोटांचा साठा आढळल्याने पोलिसही गोंधळात सापडले.पोलिसांकडून अर्शद खानचा शोध सुरू असून, या प्रॉप करन्सीचा वापर योग्य परवानगीशिवाय किंवा स्पष्ट माहितीशिवाय केला जात असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकरणांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने चित्रपट निर्मात्यांनी याबाबत अधिक पारदर्शकता बाळगावी, अशी मागणीही आता पुढे येत आहे.ही घटना सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.