Vegetable garden at home in summer एप्रिल महिन्यात उन्हाळ्याचा कडाका वाढतो. अशा कठीण हवामानात बागकाम करणे आव्हानात्मक वाटू शकते. मात्र काही विशिष्ट भाज्या आहेत ज्या या दिवसांत सहज उगवतात आणि घरच्या घरी ताजी भाजी मिळवण्याचा उत्तम पर्याय ठरतात. अंगण असो की टेरेस, लहान कुंड्यांमध्येही या भाज्या लावता येतात. त्यामुळे तुमच्या जेवणात ताजेपणा तर येतोच, पण बागकामामुळे मनालाही प्रसन्नता लाभते. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात सहज लागवड करता येणाऱ्या काही महत्त्वाच्या भाज्यांबद्दल—
भेंडी:
उन्हाळ्यात सहज उगवणाऱ्या भाज्यांमध्ये भेंडी आघाडीवर आहे. सुपीक मातीने भरलेल्या कुंडीत भेंडीची बियाणं सुमारे १२ इंच अंतरावर पेरावीत. नियमित पाणी दिल्यास काही आठवड्यांत भेंडीचे रोप जोमाने वाढू लागते आणि लवकरच त्याला शेंगा येतात.
हिरवी मिरची:
मिरचीची लागवड करणं फारसे कठीण नाही. कुंडीत बियाणं टाकताना दर दोन बियाण्यांमध्ये सुमारे १० इंचाचं अंतर ठेवावं. जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी दर दोन दिवसांनी पाणी द्यावं. योग्य काळजी घेतल्यास काही दिवसांतच मिरचीचे रोप तयार होते.
काकडी:
काकडी ही उन्हाळ्यातील एक आरोग्यदायी भाजी. कुंडीत तिची लागवड करून नियमित पाणी दिल्यास काकडी काही आठवड्यांत फळधारणा करू लागते. थोडी जागा आणि नियमित देखभाल ही काकडीच्या चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाची असते.
वांगी:
वांग्याचं रोप उन्हात चांगले वाढते. कुंड्या लहान असल्या तरी त्यात वांगी सहज उगवतं. लागवडीनंतर दररोज पाणी द्यावं लागतं. भरपूर सूर्यप्रकाशात वांगी लवकर फळधारणा करतं.
टोमॅटो:
घरच्या बागेत सहज उगवणारी आणि झपाट्याने फळ देणारी भाजी म्हणजे टोमॅटो. सुपीक माती, भरपूर सूर्यप्रकाश आणि नियमित पाणी व खत दिल्यास टोमॅटोचं भरघोस उत्पादन मिळू शकतं.उन्हाळ्यातील ऊन आणि उष्मा लक्षात घेता योग्य वेळ, बियाण्यांची निवड आणि पाण्याचं योग्य नियोजन केल्यास घरच्या घरी सहजपणे ताज्या भाज्या उगवता येतात. त्यामुळे हिवाळ्याइतकेच उन्हाळेही तुमच्या घरात हरित आणि आरोग्यदायी ठरू शकतात.