अमरावती,
Amravati Airport अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नावे देण्यात आल्याचे एलाइंस एअरने खा. बळवंत वानखडे यांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रातून स्पष्ट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र व राज्य सरकारकडून नावाच्या अनुषंगाने अजून कोणतीही अधिसूचना निघालेली नाही, हे विशेष! स्थानिक प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला नाही.

विमानतळाला कोणाचे नाव द्यायचे, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सर्व प्रथम प्रद्याचक्षू गुलाबराव महाराज यांचे दिले जाईल, अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर काही लोकप्रतिनिधी, श्री शिवाजी शिक्षण संस्था व नागरिकांकडून सदर विमानतळाला डॉ. पंजाबरावांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. Amravati Airport अनेक युक्तीवादही त्यासाठी झाले. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या प्रबंध संचालक स्वाती पांडे यांना नावा संदर्भात शनिवार १२ एप्रिल रोजी विमानतळावरच पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा निर्णय घेतील. तो विषय माझा नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. कंपनीने जी निमंत्रण पत्रिका तयारी केली आहे, त्यावर डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ असा उल्लेख नसून फक्त अमरावती विमानतळ असाच उल्लेख करण्यात आला आहे.
दुसरीकडे, एलाइंस एअरचे अध्यक्ष अमित कुमार यांच्या स्वाक्षरीने अमरावतीचे खा. बळवंत वानखडे यांना १० एप्रिल रोजी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र पाठविण्यात आले आहे. ते १३ एप्रिलला समोर आले असून त्यात डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. Amravati Airport १६ एप्रिलच्या उद्घाटन कार्यक्रमाला सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहण्याचे त्यातून कळविण्यात आले आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, रविवारी उघड झालेल्या या नव्या घडामोडीला जिल्हा प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. राज्य व केंद्र शासनाचे तसे कोणतेही पत्र नाही. मग, एलाइंस एअरने कोणत्या आधारावर आपल्या निमंत्रण पत्रात नावाचा उल्लेख केला आहे, या संदर्भात चर्चा होत आहे.