Kurdai Recipe in Marathi उन्हाळा म्हणजे वाळवणांची लगबग! काही जण फिरायला जातात, काही गावी आमरसाचा आस्वाद घेतात. पण घरातली करामत स्त्री मात्र वर्षभराच्या साठवणीसाठी वाळवणाच्या कामाला लागलेली असते. कुरडई, शेवया, पापड अशा कितीतरी प्रकारांपैकी आज आपण पारंपरिक गव्हाच्या कुरडईची रेसिपी पाहणार आहोत.गव्हाचा चीक हा एक प्रकारचं सुपरफूड समजला जातो. त्यामुळे तो आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे.
कुरडईसाठी लागणारे साहित्य :
1 किलो गहू
चवीनुसार मीठ
थोडं तेल
कृती :
1. गहू भिजवणे:
1 किलो गहू तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावे. दररोज पाण्यात बदल करावा.
2. चीक काढणे:
भिजवलेले गहू गिरणीतून किंवा मिक्सरमधून थोडे इंचरवर फिरवून घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण हाताने दाबून त्यातील चीक दोन पाण्यात काढून घ्यावा.
नंतर ते पाणी गाळणीने गाळून, तलम कपड्याने पुन्हा छान गाळून घ्यावे.
3. चीक बसू देणे:
हे पाणी एका भांड्यात झाकून ठेवावे. रात्रीभर ठेवून सकाळी वरचे पाणी अलगद काढून टाकावे. खाली जी खडी तयार झाली असेल, तीच चीक.
4. चीक उकळणे:
गॅसवर एका पातेल्याला थोडासा तेलाचा हात लावून त्यात चीक व थोडेच पाणी घालावे. उकळी आल्यावर चवीनुसार मीठ टाकावे. गॅस स्लो करून, एका हाताने चीकाची धार धरावी व दुसऱ्या हाताने लाटण्याने किंवा घोट्याने सतत ढवळावे.
5. वाफ देणे:
मिश्रण एकजीव झाल्यावर त्यावर ओला पंचा घालून झाकण ठेवावे. साधारण १० मिनिटे वाफ येऊ द्यावी. मध्ये-मध्ये हलवणे आवश्यक आहे.
6. कुरडई वाळवणे:
तयार मिश्रणातून कुरडया पिठात ओतून साच्यावर घालाव्यात. त्या उन्हात चांगल्या वाळू द्याव्यात.
7. तळणे:
वाळलेल्या कुरडया तेलात तळाव्यात. या कुरडया खूपच हलक्या आणि डबल फुगणाऱ्या होतात.
गव्हाच्या चिकाचे आरोग्यदायी फायदे :
१०० ग्रॅम गव्हाच्या चिकामधून मिळतात सुमारे ४५० कॅलरीज
कॅल्शियमयुक्त, हाडं आणि केस मजबूत करतो
फॉस्फरसमुळे थकवा दूर होतो
लोह असल्यामुळे उन्हाळ्यातील कमतरता भरून निघते
प्रोटीन व स्टार्चयुक्त कार्बोहायड्रेट्समुळे शरीर सशक्त राहतं