मुंबई,
Urvashi Rautela बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा तिच्या विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 'डाकू महाराज' या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने दावा केला की उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळ तिच्या नावाचं एक मंदिर आहे. इतकंच नव्हे, तर तिने आता दक्षिण भारतातही असंच मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सिद्धार्थ कन्नन या प्रसिद्ध यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “जर कोणी बद्रीनाथला गेलं, तर शेजारीच उर्वशी मंदिर आहे.” यजमानाने जेव्हा विचारलं की लोक तिथे आशीर्वाद घेण्यासाठी जातात का, तेव्हा उर्वशी हसून म्हणाली, “आता मंदिर आहे, तर जातीलच!” एवढ्यावरच थांबत न करता, तिने सांगितलं की दिल्ली विद्यापीठातील काही विद्यार्थी तिच्या फोटोला हारही घालतात.
ट्रोलिंगचा विषय
मात्र, उर्वशी Urvashi Rautela रौतेलाचा हा दावा पूर्णतः खोटा ठरला आहे. संशोधनात असं स्पष्ट झालं आहे की बद्रीनाथजवळ 'उर्वशी देवी मंदिर' हे मंदिर निश्चितच आहे, पण त्याचा अभिनेत्री उर्वशी रौतेलाशी काहीही संबंध नाही. हे मंदिर वैदिक काळातील दिव्य अप्सरा उर्वशीला समर्पित आहे. पुराणकथेनुसार, बद्रीनाथ येथे तपश्चर्या करणाऱ्या भगवान नारायणाच्या मांड्यांमधून उर्वशी देवी प्रकट झाल्या, आणि त्यानंतर त्या स्थळी हे मंदिर उभारण्यात आलं.उर्वशी रौतेलाने 'हे मंदिर माझ्यासाठी बांधलं आहे' असा दावा करत सोशल मीडियावर स्वतःचं एक वेगळंच रूप रंगवण्याचा प्रयत्न केला असला, तरी वास्तव मात्र वेगळंच आहे. धार्मिक स्थळांची आणि श्रद्धास्थानांची चुकीची माहिती देऊन लोकप्रियता मिळवण्याचा हा प्रयत्न सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरत आहे.