तभा वृत्तसेवा
वर्धा,
Gudi Padwa गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा (शालिवाहन शक म्हणजे सातवाहन घराण्याची कालगणना) प्रारंभ झाल्याचा दिवस मानला जातो. जो सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सुरू झाला. गुढीपाडव्याला विक्रम संवत्सराची सुरुवात झाल्याचेही मानले जाते. विक्रम संवत्सर म्हणजे शालिवाहन शकाप्रमाणेच एका विशिष्ट कालगणनेची सुरुवात ती गुढीपाडव्याच्या दिवशी होते. गुढी पाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो, जो मराठी नववर्षाची सुरुवात दर्शवतो. गुढी पाडवा हा विजय आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानला जातो, असे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.

महाकाली धामतीर्थ येथे रविवार ३० मार्च रोजी गुढी पाडवा व पंधरवाडी निमित्त महापूजा, होम हवन व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्रिदेविंचे अष्टांगयोग पद्धतीने पूजन, होम हवन करण्यात आली. पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले की, गुढी पाडव्याला घरासमोर गुढी (ध्वज) उभारली जाते जी विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. Gudi Padwa हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनाने त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भास्कर घागरे, बाबाराव महाजन, बाबुलाल दिग्रसे, राघोबा कोरडे, अनिल बोडखे, चंद्रभान आसोले, गणेश काळे आदींसह माई भक्त उपस्थित होते.