रामनवमीला घरबसल्या रामललाचे दर्शन

02 Apr 2025 15:00:04
अयोध्या,
Ram Navami 2025 रामनवमीच्या पवित्र दिवशी अयोध्येतील रामललाचे दर्शन घरबसल्या घेता आले तर? कोट्यवधी भारतीयांची ही इच्छा ओटीटी प्लॅटफॉर्म 'जिओ हॉटस्टार' पूर्ण करणार आहे. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत अयोध्या राम मंदिरातील रामनवमी उत्सवाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे अयोध्येला न जाता कुटुंबासह भगवान रामाच्या जन्मसोहळ्याचा आनंद घरबसल्या घेण्याची संधी मिळणार आहे.
 
 
 
Ram Navami 2025
 
 
विशेष लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम
 
'जिओ हॉटस्टार'ने या अनोख्या प्रसंगासाठी विशेष तयारी केली आहे. या प्रसारणादरम्यान, मेगास्टार अमिताभ बच्चन रामकथेतील प्रेरणादायी कथा सांगणार आहेत. भगवान रामाच्या जीवनमूल्यांवर आधारित विचार आणि रामायणातील महत्त्वाचे प्रसंग यांचा समावेश असणार आहे.या विशेष प्रसारणात अयोध्येतील भव्य पूजाविधी, मंदिरातील मंगलमय वातावरण, भद्राचलम, पंचवटी, चित्रकूट या धार्मिक स्थळांवरील उत्सव दृश्ये आणि आरतीचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर आणि लोकगायिका मालिनी अवस्थी यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने हा अनुभव अधिक भव्य होईल.
 
 
या ऐतिहासिक Ram Navami 2025  कार्यक्रमाचा भाग होण्याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, "अशा पवित्र प्रसंगाचा भाग होणे हा आयुष्यभराचा सन्मान आहे. रामनवमी हा केवळ सण नसून तो धार्मिक चिंतन, भक्ती आणि नीतिमत्तेचे आदर्श स्वीकारण्याचा काळ आहे."'जिओ हॉटस्टार'ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "रामनवमी हा आपल्या देशातील अत्यंत आदरणीय उत्सव आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोकांपर्यंत हा पवित्र सोहळा पोहोचवण्याचा आम्हाला सन्मान आहे. अमिताभ बच्चन यांच्या कथनामुळे हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरेल."या विशेष लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे रामभक्तांना अयोध्येतील भव्य सोहळ्याचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे. ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता 'जिओ हॉटस्टार'वर भगवान रामाच्या दर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका!
Powered By Sangraha 9.0