जालना,
jalna crime मोबाईल फोन पाटाच्या पाण्यात टाकल्याच्या रागातून एका १३ वर्षीय बालकाने ४१ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे (वय ४१, रा. आंतरवाली टेंभी, ता. घनसावंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. २५ मार्च रोजी त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला होता. याप्रकरणी मीराबाई यांच्या भावाने तीर्थपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी तपास करत असताना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार, एका अल्पवयीन बालकावर संशय घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला वारंवार शेतात जाणारे पाटाचे पाणी अडवत होती आणि या बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केला होता. याचा राग मनात धरून २५ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास मीराबाई शेतात झोपल्या असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक साजीद अहमद, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी केला.हा संपूर्ण प्रकार जिल्ह्यात खळबळजनक ठरला असून, पुढील तपास सुरू आहे.