मुंबई,
Aamir Khan बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नुकत्याच मुंबईत झालेल्या 'अंदाज अपना अपना' या त्याच्या कल्ट क्लासिक चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला अनुपस्थित राहिला. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट आज, २५ एप्रिल रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर कलाकार आणि क्रू मेंबर्ससाठी खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. मात्र, आमिरने या स्क्रिनिंगला हजेरी लावली नाही.

आमिरच्या अनुपस्थितीमागचं कारण म्हणजे जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला भीषण दहशतवादी हल्ला. सुभाष के. झा यांच्याशी बोलताना आमिरने स्वतः या घटनेबाबतची भावना व्यक्त केली. तो म्हणाला, "मी काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या घटनेच्या बातम्या वाचत होतो. निष्पाप लोकांच्या हत्या झाल्याची बातमी वाचून मन सुन्न झालं. अशा वेळी चित्रपटाचं प्रिव्ह्यू पाहण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतो. या आठवड्याच्या शेवटी कधीतरी मी हा चित्रपट पाहेन."'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या क्रूर घटनेचा अनेक बॉलिवूड कलाकारांनी तीव्र निषेध केला आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या टीमनेही इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "पहलगाममध्ये Pahalgam Terror Attack नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आम्हाला धक्का बसला आहे. निष्पाप लोकांचे प्राण गेले आणि अनेकांना दुःख सहन करावं लागत आहे. आमच्या संवेदना पीडित कुटुंबीयांसोबत आहेत," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल, शक्ती कपूर, शहजाद खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. मात्र, काळाच्या ओघात तो एक कल्ट क्लासिक कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लागला.
या Aamir Khan चित्रपटाच्या अपयशाबाबत बोलताना आमिर म्हणतो, "राज संतोषी आणि मी दोघेच असे होतो ज्यांना या चित्रपटावर विश्वास होता. आम्हाला तो खूप आवडला होता. पण जेव्हा तो चालला नाही, तेव्हा आम्हाला वाईट वाटलं. मात्र, पुढे जाऊन तो माझ्या घरगुती मनोरंजनाच्या यादीतलं सर्वात मोठं यश ठरलं."