अजय देवगण पुन्हा अमय पटनायकच्या भूमिकेत

28 Apr 2025 14:10:01
मुंबई,
Red 2 ८ वर्षांनंतर अजय देवगण पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'रेड' या चित्रपटाचा सिक्वेल 'रेड २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निवडक शोसाठी आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच 'रेड २' ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः दिल्ली-एनसीआर आणि मुंबई या प्रमुख सर्किटमध्ये चित्रपटाची तिकिटे झपाट्याने विकली जात आहेत.
 
 

Red 2 
या वेळी अजय देवगणसोबत रितेश देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे, तर वाणी कपूरला प्रमुख अभिनेत्री म्हणून घेण्यात आले आहे. मागील भागात दिसलेली इलियाना डिक्रूझ या चित्रपटात नाही. 'रेड २' चे दिग्दर्शन पुन्हा एकदा राज कुमार गुप्ता यांनीच केले आहे. याशिवाय, सौरभ शुक्ला देखील आपल्या गाजलेल्या भूमिकेत परतणार आहे. विशेष आकर्षण म्हणून तमन्ना भाटियावर एक खास आयटम साँग चित्रीत करण्यात आले आहे.
 
 
 
 
तिकीट विक्रीचा वेग
चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, २६ एप्रिलपासून आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, कमी प्रमोशन असूनही 'रेड २'च्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे. अवघ्या दोन दिवसांत ३९६८ शोसाठी एकूण ९२.६२ लाख रुपयांची ग्रॉस बुकिंग झाली आहे. जर ब्लॉक सीट्सचा समावेश केला तर ही रक्कम २.०६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी सकाळपर्यंत एकूण २९,७१५ तिकिटे विकली गेली होती.पहिल्या दिवशी 'रेड २'ने ४५.१६ लाख रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग केली होती. त्यानंतर देशभरात २,३३८ शोसाठी १३.७ हजार तिकिटे विकली गेली. शनिवारी ही संख्या वाढून ३५०० हून अधिक शो आणि २९ हजारांपेक्षा जास्त तिकिटांपर्यंत पोहोचली. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी तिकीट विक्रीचा वेगही अधिक वाढण्याची शक्यता आहे.
 
 
'रेड २' ला सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वोत्तम प्रतिसाद मिळत असून, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्येही चांगली तिकिट विक्री होत आहे. २०२५ मध्ये 'छवा' वगळता कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला फारशी मोठी कमाई करता आलेली नाही. 'छवा'च्या आगाऊ बुकिंगची स्थितीही समाधानकारक नव्हती. अशा परिस्थितीत, 'रेड २' कडे २०२५च्या टॉप-५ अॅडव्हान्स बुकिंग यादीत स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे.
 
 
या यादीत स्थान मिळवण्यासाठी 'रेड २'ला 'केसरी चॅप्टर २'ला मागे टाकावे लागेल. अजून तीन दिवसांचे आगाऊ बुकिंग शिल्लक असताना, 'रेड २'साठी हे आव्हान फारसे कठीण वाटत नाही. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी नेमकी किती कमाई होते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. यामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवरही मोठा परिणाम होऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0