तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी,
Pahelgam attack : पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील सकल हिंदू समाजाने काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते.
शेंबाळपिंपरीच्या सर्वधर्मीयांनी या निषेध मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला. मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण गावांच्या मुख्य रस्त्यावरून पदयात्रा निघाली. त्यामध्ये मुस्लिम बांधवांचा आवर्जून समावेश होता. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादसह जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पहेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप व्यक्तींना हिंदूच असण्याची खात्री करून गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषधार्थ शेंबाळपिंपरीचे हजारो लोक रस्त्यावर उतरले होते.
त्यात प्रामुख्याने राजेंद्र साकला, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष गणेश पागिरे, डॉ. नंदकुमार देशमुख, राजे दिलीपसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य जैनुल सिद्दिकी, रऊफ सिद्दिकी, उस्मान डांगे, बापूराव कांबळे, देविदास कांबळे यांचा समावेश होता.