तभा वृत्तसेवा
मूल,
Tiger attack : तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी युवा शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (38) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यातील हा दुसरा बळी असून, वर्षभरातील चार महिन्यात नऊ जणांचा बळी गेला.
शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेषराजला वाघाने सावली वनपरिक्षेत्रातून चिचपल्ली वनपरिक्षेत्रात दूरवर फरफटत नेले होते. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतकाच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून वनविभागाने 50 हजार रुपये दिले आहेत.
चितेगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभित आहेत. गुरुवारी याच वाघाने गावात घूसून एक गाय आणि एका गोर्हाला ठार केला. त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी ही घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.