पुणे,
viral video पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्री महिलेच्या अपहरणाची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत असलेल्या काळभोर नगर परिसरात ही घटना घडली असून, संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तिघांनी एका महिलेचं अपहरण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एअरटेल गॅलरीसमोर महिलेचा पाठलाग करून तिघांनी तिचा प्रतिकार झुगारून देत जबरदस्तीने तिला गाडीत बसवले आणि अपहरण केले. अपहरणाच्या वेळी महिला आरडाओरड करत होती, मात्र आरोपींनी तिचा विरोध न जुमानता तिला बळजबरीने गाडीत ओढून नेले.
या संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करत घटनेची माहिती दिली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे.दरम्यान, या प्रकरणाची नोंद पिंपरी पोलीस ठाण्यात झाली असली तरी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही घटना कौटुंबिक वादातून घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे, अशी माहिती निरीक्षक कडलक यांनी दिली.शहरात भररात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून, नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.