आमगाव,
Amgaon jewelry theft case मामाच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भाचीने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना आमगाव तालुक्यातील शिवनी येथे पोलिस तपासात उघडकीस आली.
आमगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या शिवणी येथील संगीता पाथोडे (३९) यांनी आमगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नणंदेच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी आपले सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी संगीता पाथोडे यांच्याकडे दिले होते. हे दागिने संगिताने पिशवीत गुंडाळून घरातील बेडरुममधील लाकडी पेटीत ठेवले होते. परंतु, १४ मार्च रोजी आरोपी भाग्यश्री मेंढे ही भाची वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लहान मुलाला घेऊन संगीताकडे मुक्कामी आली होती. १४ मार्च रोजी सायंकाळी संगिताने ते दागिने भाग्यश्रीला दाखविले होते. ते दागिने पाहून भाग्यश्रीला मोह सुटला आणि संधी साधून तिने ते दागिने आपल्या बॅगमध्ये टाकले. दुसर्या दिवशी, म्हणजेच १५ मार्च रोजी ती आपल्या गावी भोसा येथे ते दागिने घेऊन निघून गेली. इकडे घरात दागिन्यांची चोरी झाल्याचा कांगावा झाल्याने २२ मार्च रोजी दूरध्वनीवरून भाग्यश्रीला देखील विचारणा झाली. परंतु, तिने आपण चोरी केली नाही, असे सांगितले. दरम्यान, सोन्याचे ३ हार, ३ जोड कानातले, ३ अंगठ्या, १ जोड पायल व ३ जोड नथ, असे एकूण २ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे आमगाव पोलिसांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिस पथकाने संशयित आरोपी भाग्यश्री ही चोर असल्याचे उघडकीस आणले. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चोरीचे दागिने शौचालयासह तलावातून हस्तगत
आमगाव पोलिसांनी तपासाअंत आरोपी भाग्यश्रीला ताब्यात घैतल्यानंतर कसून चौकशी केली असता तिने कारवाईच्या भीतीने काही दागिने शौचालयात टाकल्याचे तर काही दागिने हे कामठा येथील तलावात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खोदकाम करून दोन्ही ठिकाणचे दागिने हस्तगत केले.
...