Thursday, January 9, 2025

अण्णू गोगट्या लोकशाहीचा मारेकरी!

    दिनांक :21-Dec-2024
Total Views | 13
यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न
Annu Gogate : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राच्या ओठावर हसू फुललेलं राहील याची काळजी घेतली. ‘व्यक्ती आणि वल्ली’ हा मराठीतला सर्वात प्रसिद्ध कथासंग्रह मानला जातो. या पुस्तकात अंतू बरवाची कथा येते. कुणी पडलं तर अंतू बरवा ओरडतो, ‘‘अण्णू, झाला काय रे?’’ रत्नागिरीत अण्णू गोगटे वकील प्रत्येक वेळी म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीत म्हणून पु. ल. म्हणतात, अण्णू गोगट्या होणे म्हणजे ‘पडणे’ हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. तसंच याबाबतीत काँग्रेसचे सुद्धा आभार मानणे क्रमप्राप्त आहे. कारण काँग्रेसनेही देशाला एक राष्ट्रीय ‘अण्णू गोगट्या’ दिलेला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. मी ५४ वर्षांचे स्वयंघोषित नेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलत आहे. गांधी राजकारणात लाँच झाल्यापासून पडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेसचा वाईट पराभव झाला. तरी सुद्धा आताचा पराभव मागच्या पराभवापेक्षा बरा होता, अशा आविर्भावात ते पराभवालाच आपला विजय मानतात. ही त्यांची निरागसता नसून हा त्यांचा माजोरडेपणा आहे. काँग्रेस आणि देश आपल्या मालमत्ता असल्यासारखे ते वागत असतात.
 
 
rahulg
 
 
Annu Gogate : तसेच राहुल हे अत्यंत खोटारडे देखील आहेत. ते वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वा. सावरकरांबद्दल खोटी विधाने करत असतात. अशा विधानांसाठी त्यांना कोर्टात माफी मागावी लागते. पण ते बाहेर येऊन पुन्हा निर्लज्जाप्रमाणे खोटी विधाने करतात. आता लोकसभेत भाषण करताना त्यांनी पुन्हा खोटारडेपणा केला. ते म्हणाले, ‘‘सावरकरांनी स्पष्टपणे लिहिले आहे की आपल्या भारतीय काहीही नाही. हा देश मनुस्मृतीनुसार चालला पाहिजे. त्यामुळे तुम्ही (भाजपा) राज्यघटनेचे रक्षण करण्याचा दावा करता, तेव्हा तुम्ही सावरकरांची खिल्ली उडवत आहात, त्यांची बदनामी करत आहात.’’ राहुल गांधींनी हे विधान केले खरे पण त्याचा पुरावा त्यांनी दिला नाही. सावरकरांनी असे कुठे लिहिले आहे आणि कधी म्हटले आहे, हे राहुल आयुष्यात कधीच सांगता येणार नाही. कारण सावरकरांनी असे कोणतेच विधान केले नव्हते. उलट सावरकर हे खर्‍या अर्थाने पुरोगामी होते. कोणताही धार्मिक ग्रंथ हा केवळ पूजनीय असतो, तो पूर्णपणे अनुकरणीय असेल असे नाही, असे सावरकरांचे मत होते. सावरकरांनी मनुस्मृतीचा अभ्यास करून त्यातल्या कालबाह्य गोष्टी लोकांच्या नजरेस आणून दिल्या आहेत. पण गांधींना या गोष्टी कळू शकत नाहीत. कारण ते मूर्ख आणि माजोरडे आहेत. हे दोन अवगुण जेव्हा एकत्र येतात त्यावेळी माणूस पराकोटीचा अहंकारी होतो. म्हणजे आपण कोणतेच ज्ञान मिळवू शकत नाही ही आपल्या बुद्धीची मर्यादा असते, पण आपण अत्यंत श्रीमंत आणि सत्ता असलेल्या कुटुंबात जन्मले असतो, तेव्हा कोणत्याही कर्तृत्वहीन माणसामध्ये येतो आणि बुद्धीच्या मर्यादेवर सत्तेचं आणि श्रीमंतीचं आवरण घातलं जातं. मग निर्बुद्धपणालाच बुद्धी, ज्ञान अशी खोटी लेबलं लावत तो माणूस हिंडत राहतो. त्यांचे चेले देखील सत्तेत राहण्यासाठी, मर्जित राहण्यासाठी मूर्खपणाला ‘वाह वाह’ म्हणत दाद देत बसतात.
 
या वादात आता उद्धव ठाकरेंनी उडी घेतली आहे. आता पालिकेच्या निवडणुकीसाठी हिंदुत्वाची कातडी त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेत असल्याचा खोटाच आव आणला. त्यांच्या मते काँग्रेस आणि भाजपाने सावरकर-नेहरू करणे बंद केले पाहिजे. पण उद्धव ठाकरे यांना मुद्दाच कळलेला नाही. राहुल गांधी किंवा काँग्रेस सावरकरांवर टीका करत नाहीत, त्यांच्या वक्तव्याचे खंडन करत नाहीत तर ते सावरकरांवर खोटे आरोप करतात, त्यांची बदनामी करतात. जे कधी बोललेच नव्हते, ते बोलले आहेत असं म्हणतात. भाजपाच्या नेत्यांनी सप्रमाण नेहरूंची चूक दाखवून दिली आहे. त्यास ऐतिहासिक पृष्ठभूमी आहे. खंडन करणे आणि विनाकारण बदनामी करणे यातला फरक कळायला हवा. त्यामुळे ठाकरेंनी आधी मुद्दा समजून घेतला पाहिजे, त्यानंतरच वक्तव्ये केली पाहिजे.
 
 
Annu Gogate : आता राहुल गांधींचा अहंकारी स्वभाव पुन्हा समोर आला संसदेबाहेर आंदोलनावेळी राहुल गांधींनी मुकेश राजपूत या भाजपा खासदाराला ढकललं आणि ते भाजपाचे वयोवृद्ध खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावर जाऊन पडले, त्यामुळे त्यांना दुखापत झाली. मुकेश राजपूत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी गांधींना जाब विचारला तेव्हा ते निर्लज्जपणे आणि उर्मटपणे बोलून तिथून निघून गेले. हा राहुल गांधींचा चेहरा आहे. राहुल गांधी हे पप्पू नसून पप्पूच्या वेशात वावरणारे भयावह वृत्तीचे व्यक्ती आहेत, असे कोणी म्हटले तर खोटे ठरणार आहे का? काँग्रेस हा पक्ष राहुल आणि सोनिया गांधींच्या पूर्णपणे आहारी गेल्यामुळे आता या पक्षाची निष्ठा देशाबद्दल राहिली नसून त्यांनी ती सोनिया आणि राहुल चरणी वाहिली आहे. त्यामुळे लोकशाही संविधानाला बाधा पोहोचेल अशा गोष्टी ते करत असतात. त्यात राहुल हे त्यांचं प्रमुख नेतृत्व अत्यंत अहंकारी असल्यामुळे सबंध काँग्रेस पक्ष हा अहंकारी झालेला आहे.
 
 
Annu Gogate : अमित शाह यांच्या भाषणातला छोटा भाग काढून त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा खोटा आरोप काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वात करत आहे. त्यांचा सर्वोच्च खोटारडा, माजोरडा आणि अहंकारी असेल तर बाकी त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेले त्यांचे इतर नेते दुसरं काय करणार? त्या भाषणात खरं तर अमित शाह यांनी बाबासाहेबांचा गौरव केला असून काँग्रेसने या महामानवाला कसा त्रास दिला हे पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काँग्रेसवर टीका केलेली आहे. मात्र सत्य न जाणून घेता किंवा मान्य न करता राहुल गांधी आणि त्यांचे चेले देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करत आहेत. टूलकिट प्रकरणातही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. मग राहुल गांधी डीप स्टेटच्या साहाय्याने भारताचा बांगलादेश करायला निघाले आहेत अशी शंका जर कुणी व्यक्त केली तर त्यात काही ठरणार आहे का? प्रत्येक भारतीयांना राहुल गांधींच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. सावरकरांसारख्या देशभक्ताला बदनाम करून राहुल गांधी देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण करत आहेत. आता हीच वेळ आहे काँग्रेसने या अहंकारी व्यक्तीला पक्षातून काढून संविधान आणि लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे. नाहीतर ड्युप्लिकेट गांधी कुटुंबाचा हा अण्णू काँग्रेसची पूर्ण वाताहत करून टाकेल, तसेच या गोष्टी देशासाठी, लोकशाहीसाठी व संविधानासाठीही घातक ठरतील. सरकारने देखील राहुल गांधींच्या अशा खोट्या वक्तव्यांसाठी आणि वर्तणुकीसाठी त्यांना शासन केले पाहिजे.